मुख्य सामग्रीवर वगळा

प्रेमयोग




















प्रेम- 
कुणावर करावं ?
     कुणावरही करावं. 

प्रेम - 
राधेच्या वत्सल स्तनावर करावं 
कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, 
    भीष्मद्रोणांच्या थकलेल्या 
    तीर्थरूप चरणांवर करावं, 
    दुर्योधन - कर्णाच्या अभिमानी 
    अपराजित मरणावर करावं ,
प्रेम कुणावरही करावं. 

प्रेम - 
सुदामा नावाच्या भटजींवर करावं 
अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं , 
    बासरीतून पाझरणाऱ्या 
    सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं , 
    यमुनेचा डोह जहरुन टाकणाऱ्या 
    कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं. 

प्रेम - 
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं 
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं , 
    गायीच्या नेत्रांतील 
    अथांग कारुण्यावर करावं , 
    मोराच्या पिसाऱ्यातील 
    अद्भुत लावण्यावर करावं , 
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं , 
आणि खङगाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं. 

प्रेम - 
गोपींच्या मादक लीलांवर करावं 
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, 
    यशोदेच्या दुधावर - 
    देवकीच्या आसवांवर - 
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील 
    नांगराच्या फळ्यावर करावं , 
कंसाच्या काळजातील 
    द्वेषाच्या जाळ्यावर करावं, 
ज्याला तारायंचं 
    त्याच्यावर तर करायचं 
पण ज्याला मारायचं 
    त्याच्यावरही करावं, 
प्रेम कुणावरही करावं. 

प्रेम - 
योगावर करावं. 
भोगावर करावं. 
आणि त्याहूनही अधिक 
    त्यागावर करावं. 

प्रेम - 
चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या 
जीवनाच्या द्रवावर करावं, 
आणि पारध्याच्या बाणांनं घायाळ होऊन 
अरण्यात एकाकी पडणाऱ्या 
स्वतःच्या शवावरही करावं, 
प्रेम कुणावरही करावं. 
कारण - 
प्रेम आहे माणसाच्या 
    संस्कृतीचा सारांश 
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष 
आणि भविष्यकाळातील 
त्याच्या अभ्युदयाची आशा 
एकमेव ? 

:  प्रेमयोग 
: छंदोमयी 
: कुसुमाग्रज 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घे...

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  । तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।। शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।। बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके । ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।। बोलावे बरे । बोलावे खरे । कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।। कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग । जातपात धर्म । काढूच नये ।। थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे । मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।। शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती । स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।। शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल । शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।। जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता । पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।।

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती   कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना गहिवर यावा जगास सा - या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर _ गुरु ठाकूर