आहे मुलखावेगळा
माझा मुलुख दूरचा
तेथे मुसाफिरा तुला
धीर आहे का यायचा ?
दूरवरून चोरून
मला घातलास डोळा
कधी जवळीक होतां
केला अंचलाशी चाळा.
माझा गालाओठांवरी
काही कैवल्याचे दंव
दिसे तुला, टिपाया ते
तुझे आतुरले भाव !
जेव्हा मालवती दिवे
घरा मौनावते सारी
तुझी छाया थरथरे
माझ्या राहुटाच्या दारी
मला उमगल्या पांथा,
तुझ्या प्रणयाच्या खुणा
आता मिलनाच्या मार्गी
तुझा धीर मात्र उणा !
वाट बिकट पुढची
खोल तुटलेले कडे
कोठे दावानल पथी
घाली निखाऱ्यांचे सडे .
जिथे निर्जनाचा नाग
फणा काढोनिया असे
फुटे कुचेष्टेचे क्रूर
बुंद्याबुंद्यावर हसे !
जाती पेटवीत थडी
अग्निसारितांचे जळ
त्यांत वल्व्हाया नौका
हवे अंतराचे बळ.
अशा प्रदेशाच्या पैल
माझा महाल जाम्भळा
त्यांत मेघमंचावरी
घडे मिलन सोहळा.
भुलणारे भुलवावे
माझ्या नांवाची ही ख्याती
माझ्यापायी कितिकांचा
झाली जीवनाची माती !
माझी संगत धरता
ठरे ललाटाचा खेळ
घ्यावा सर्वनाश किंवा
घ्यावें स्वर्गीय तें सुख.
देते म्हणून इशारा
माझा मुलूख दूरचा
तेथे मुसाफिरा तुला
धीर आहे का यायचा ?
: धीर
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा