व्यर्थ गेला तुका । व्यर्थ ज्ञानेश्वर ।
संतांचे पुकार । वांझ झाले ।।
रस्तोरस्ती साठे । बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग ।तुडुंबला ।।
बैंड वाजविती । सैंया पिया धून ।
गजाचे आसन । महंतासी ।।
भाले खङग हाती । नाचती गोसावी ।
वाट या पुसावी । अध्यात्माची ।।
कोणी एक उभा । एका पायावरी
कोणास पथारी । कंटकांची ।।
असे जपीतपी । प्रेक्षकांची आस ।
रुपयांची रास ।पडे पुढे ।।
जटा कौपिनांची ।क्रीडा साहे जळ ।
त्यात हो तुंबळ । भाविकांची ।।
क्रमांकात होता । गफलत काही ।
जुंपते लढाई । गोसाव्यांची ।।
साधू नहातात । साधू जेवतात ।
साधू विष्ठतात । रस्त्यावरी ।।
येथे येति ट्रक । तूपसाखरेचे ।
टँकर दुधाचे । रिक्त येथे ।।
यांच्या लंगोटीला । झालर मोत्यांची
चिलीम सोन्याची । त्याच्या पाशी ।।
येथे शंभराला । लाभतो प्रवेश
येथे लक्षाधीश । फक्त जातो ।।
अशी झाली सारी । कौतुकाची मात ।
गांजाची आयात । टनावारी ।।
तुका म्हणे ऐसे । मावेचे मईंद ।
त्यापाशी गोविंद । नाही नाही ।।
: पर्वणी
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा