प्रीति ना आपुली
फुलांची कळ्यांची
कोमलपणाची
निथळे जित्यात असह्य वेदना
अखंड रणाची !
प्रीति ना आपुली
दंवाच्या थेंबाची
पर्णात रंगली
विजेचा लोळ जो गर्जत जाळतो
मेघांच्या जंगली !
प्रीति ना आपुली
गीतांची रसाळ
शब्दांची मंजुळ
लाटांचे डोंगर जोडीत फोडीत
तुफान वादळ !
प्रीति ना आपुली
चिऊची काऊची
पंखांची पिसांची
तिच्यात रात्र ती विषन्न काजळी
अज्ञातवासाची !
प्रीति ना आपुली
संतोष सुखाची
सारंगी बिनाची
आहे ती व्यथेची गहन दुःखाची
अथांग मौनाची !
: आहे ती व्यथेची
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा