कळी दवं होण्याआधी
लांबव हि रात्र थोडी
फूल- ओल्या निःश्वासांची
थांबावं ही वेडी घडी
असेलही रात्र खोटी
चंद्र असेल काचेचा
खेळ असेल रंगीत
पाठ केलेला वाचेचा
दूर हाडकुळी झाडे
मुके मुके भुंकतात
वेढणाऱ्या अंधारात
काजव्यांनी खंगतात
इथे येतांना वाटेत
झाड झाड शोधिले मी
तम टोचुन नसांत
शाप माझे भोगिले मी
उंबरठा खोलीचा या
झाला चोरट्या दिसांचा
झुले काळोख डोळ्यांत
थेंब बावऱ्या पिसांचा.
जन्मे तोतऱ्या क्षणांत
शब्द हिरव्या पंखांचा
गर्भापरी सोशीला मी
स्पर्श तांबड्या डंखाचा
कळी दंव होण्याआधी
करू नको मिठी सैल
गंजलेले चार डोळे
उभे क्षणाच्या या पैल.
: कळी दंव होण्याआधी
: उत्सव
: मंगेश पाडगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा