माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे ?
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रानीं
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे ?
वर्ख लावून कागदी
माझे नाचते बाहुलें
कधी कराया कौतुक
खाली वाकशील का रे ?
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे ?
माझा रांगडा अंधार
मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी
कधी टिपशील का रे ?
: मातीचे गायन
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा